मराठी भाषा : आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा

Arise International School, Bhosari
मराठी भाषा : आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा

13 Aug 2026

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" या कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने भारावून टाकतात. मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.संतांच्या ओव्यां- पासून ते आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या ज्ञानभांडारापर्यंतचा प्रवास मराठी भाषेने समर्थपणे केला आहे.

मराठी भाषेचा इतिहास हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी आपल्या साहित्यनिर्मितीतून मराठीला समृद्ध केले. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांसारख्यासाहित्यिकांनी मराठी भाषेची श्रीमंती अधिक वाढवली. त्यामुळे मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून विचार, संस्कार आणि ज्ञान यांची वाहक बनली आहे.

आजच्या डिजिटल युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व नक्कीच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचे जतन करणेही तितकेच आवश्यक आहे. मराठी पुस्तके वाचणे, कविता पाठ करणे, कथा ऐकणे आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करणे ही भाषा जिवंत ठेवण्याची प्रभावी साधने आहेत. भाषा ही केवळ शब्दांचा संग्रह नसते, तर ती संस्कृतीचे प्रतिबिंब असते. मराठी भाषेतून आपल्या भावना अधिक सहजपणे व्यक्त करता येतात. आईची माया, निसर्गाचे वर्णन, सण-उत्सवांचे रंग आणि समाजजीवनातील विविध अनुभव मराठीतून अधिक आत्मीयतेने व्यक्त होतात.

आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा योग्य सन्मान करावा. आपल्या पुढील पिढीला मराठीची गोडी लावण्यासाठी मराठी साहित्य वाचण्यास प्रोत्साहन देणे आणि आधुनिक माध्यमांतून मराठीचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

कारण मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या अस्तित्वाची आणि संस्कृतीची अमूल्य ओळख आहे.

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी "

-शारदा म्हसये
PRT Marathi